Supriya Sule News: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या बैठकीत मोठा गौप्यस्फोट करत एक गंभीर दावा केला आहे. “शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिन्यांत आणखी एक बळी जाणार आहे,” असे विधान करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, त्या व्यक्तीचे नाव जाहीर करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. कोणाचा बळी जाणार? कोणता नेता अडचणीत येणार? या प्रश्नांनी राजकीय वातावरण तापले आहे.

धनंजय मुंडेंवर थेट हल्लाबोल
या बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. “जो बायकोच्या गाडीत बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो, त्याच्यासोबत काम करणे शक्य नाही,” असे म्हणत त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
पक्ष फुटल्याने समाधान व्यक्त करत सुळे म्हणाल्या, “अशा अनैतिक प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष करायला हवा. पैसा आणि सत्तेसाठी सर्व काही करणे ही प्रवृत्ती घातक आहे.”
“सत्ता आणि पैशांसाठी झुकणं बंद झालं पाहिजे!”
सुप्रिया सुळे यांनी सत्ता आणि नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “मी कधीही नैतिकता सोडणार नाही. गरज पडली तर विरोधी पक्षात राहील, पण चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“बीडच्या संतोष देशमुख यांच्या आईच्या डोळ्यातलं पाणी, महादेव मुंडे यांच्या पत्नीचं दुःख… त्यांच्या लेकरांनी काय गुन्हा केला होता? सत्ता आणि पैशासाठी हे सगळं कबूल करायचं का?”
हेही वाचा:-👇
Nitin Gadkari news: मुस्लिम तरुण इंजिनिअर, IAS-IPS झाले तर समाज बळकट होईल; मी कधीही जात-धर्मात भेदभाव करत नाही
“एक मंत्र्याचीही लवकरच विकेट पडणार!”
धनंजय मुंडेंवर टीका करतानाच, त्यांनी अजून एका मंत्र्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “राज्यातील एक मंत्री खूप बोलत आहेत, पण ते बायकोच्या आड लपतात. मात्र, लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की ते कोण आहेत. चार-सहा महिन्यांत त्यांचीही विकेट पडल्याशिवाय राहणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, हा मंत्री कोण याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीमुळे पक्ष फुटला असला तरी कार्यकर्त्यांनी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. “एवढी वर्षे आपण सत्तेत होतो. आता विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्याची वेळ आहे. कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे आणि नव्या संघर्षासाठी सज्ज व्हावे,” असे त्यांनी आवाहन केले.
त्यांच्या या परखड भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. पुढील काही महिन्यांत कोणाची विकेट पडणार आणि कोणत्या बड्या नेत्याच्या भवितव्यावर गंडांतर येणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.